आज 308 व्यक्ती कोरोनामुक्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ नंदुरबार ( जिमाका वृत्तसेवा ) दि . 3 : सप्टेंबर 2020
कोरोनाबाधिताना वेळेवर उपचार मिळावे यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असून आज दिवसभरात 308 बाधित उपचाराअंती बरे होऊन घरी परतले . बुधवारी देखील 123 बाधितांना कारोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते . जिल्ह्यात आतापर्यंत 2833 कोविड पॉझिटीव्ह आढळले असून त्यापैकी 1706 बरे झाले आहेत . 1044 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 78 बाधितांचा मृत्यू झाला आहे . स्वब चाचणी वाढल्याने मृत्यू दरातही सुधारणा होत आहे . गेल्या काही दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होऊन तो 60 टक्क्यापर्यंत पोहोचला असून मृत्यू दर 5.5 टक्क्यावरून 2.8 टक्क्यावर आला आहे . यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे . कोरोना आजाराची लक्षणे असल्यास त्वरीत स्वब घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे . स्वब चाचण्यांची संख्या 10 हजारावर पोहोचली आहे . त्यासाठी तालुका स्तरावर मोबाईल टीम नेमण्यात आल्या आहेत तीव्र लक्षणे असणाऱ्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रॅपीड अॅन्टीजन टेस्टची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे . स्वब चाचणीचे प्रमाण वाढल्याने आणि नंदुबार येथेच लॅब सुरू झाल्याने वेळेवर उपचार करणे शक्य झाले आहे . जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय येथील कोविड रुग्णालयात तीव्र लक्षणे असलेल्या बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत याठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरची सुविधा आहे . तर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल नंदुरबार , शहादा , नवापूर आणि सलसाडी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार करण्यात येत आहे . नंदुरबार आणि नवापूर येथे प्रतयेकी दोन खाजगी रुग्णालयात देखील शासनाने निश्चित केलेल्या शुल्का नुसार कोविड बाधितांवर उपचाराची सुविधा आहे .
Comments
Post a Comment